महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, भाजपाने मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांना दिले. तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद दिले. दरम्यान, आता बिहारच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, बिहारमध्ये आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत 'इंडिया टुडे'ने घेतलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह यांनी भाष्य केलं आहे.
२०२५ मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभेची निवडणूक एनडीए कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली लढवणार, नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएचा चेहरा असतील का? या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माध्यामांना नेहमी स्पष्ट भूमिका घेणारे अमित शहा बिहारमधील नितीशकुमार यांच्या नेतृत्वाच्या प्रश्नाला बगल देताना दिसले. शाह यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
बिहार एनडीएच्या इतर घटक पक्षांचे नेते २०२५ च्या बिहार निवडणुकीच्या निकालानंतरही नितीश कुमार यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवण्याची चर्चा करत आहेत. दरम्यान, महायुतीतील भाजपचे अमित शहा यांनी मात्र या प्रश्नावर स्पष्टपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या मोठ्या विजयानंतर स्थापन झालेल्या सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे, तर भाजपने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राची कमान सोपवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या नाराज असल्याच्या प्रश्नावर अमित शहा म्हणाले की, शिंदेजी नाराज होण्याचे कारण नाही. आमच्या पक्षाला खूप जागा मिळाल्या आहेत. गेल्या वेळीही आमच्याकडे जास्त जागा होत्या, पण आम्ही शिंदेजींना मुख्यमंत्री केले. अडीच वर्षे पूर्ण विश्वासाने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरच मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवले जाईल, असे आम्ही सुरुवातीपासूनच सांगितले होते. त्यामुळे कोणीही नाराज होण्याची गरज नाही.
एनडीएमध्ये फूट पडणार नाही: अमित शाह
महाराष्ट्राचे उदाहरण देत पत्रकारांनी बिहारच्या राजकारणाबाबत अमित शाह यांना प्रश्न विचारला. यावेळी शाह म्हणाले, 'बघा तुम्ही काहीही बोला, पण आता एनडीएमध्ये फूट पडणार नाही. काळजी करू नका.' यावेळी मुलाखतीत २०२५ ची विधानसभा निवडणूक नितीश कुमार चेहरा म्हणून लढणार का? यावर अमित शहा म्हणाले- 'पक्षाचे धोरणात्मक निर्णय या प्रकारच्या टीव्ही कार्यक्रमात घेतले जात नाहीत. असे निर्णय घेण्याचा अधिकार भाजपच्या संसदीय मंडळाकडे आहे. याशिवाय नितीश कुमार यांच्या पक्षालाही हा अधिकार आहे. सर्व पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतील.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या या उत्तरानंतर आता बिहारच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. २०१९ च्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेहमीच नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असे म्हणत होते. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा नेमकं कोणती खेळी करणार या चर्चा सुरू आहेत.