- एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारमधील महाआघाडीच्या नव्या सरकारचा उद्या, मंगळवारी (दि.१६) मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. जदयूचे वरिष्ठ नेते विजय चौधरी यांनी तसे संकेत दिले आहेत. महाआघाडीच्या घटक पक्षांत मंत्रिपद वाटपाबाबत सहमती झाली आहे. राजदला १७ ते १८, जदयूला १२ ते १३, तर काँग्रेसला तीन मंत्रिपदे मिळू शकतात. नियमानुसार मुख्यमंत्र्यांशिवाय अधिकाधिक ३६ जणांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळात यावेळी पहिल्यांदा मंत्री बनणारे अनेक चेहरे असतील. मुख्यमंत्र्यांकडे पूर्वीप्रमाणे गृहमंत्रालयाची जबाबदारी असेल. मुख्यमंत्री नितीशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली आहे. काँग्रेसला तीन मंत्रिपदे मिळणार आहेत. काँग्रेसचे बिहार प्रभारी भक्त चरण दास म्हणाले की, सध्या आमचे दोनच मंत्री शपथ घेतील. राहिलेल्या एका मंत्र्याचा पुढील मंत्रिमंडळ विस्तारात शपथविधी होईल. मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होताच शपथविधी सोहळ्याच्या तारखेची घोषणा केली जाईल.
जातीय समीकरणे लक्षात घेऊन राजदची यादीजदयूला १२ ते १३ मंत्रिपदे, राजदला १७ ते १८, तर काँग्रेसला ३ मंत्रिपदे मिळणार आहेत. एक मंत्रिपद जीतन राम मांझी यांचा पक्ष हमला मिळण्याची शक्यता आहे. जदयूचे सध्या जे मंत्री होते. त्यातील बहुतांशजणांना पुन्हा मंत्री बनविले जाणार आहे. तेजस्वी यादव जातीय समीकरणे लक्षात घेऊन मंत्र्यांची नावे निश्चित करणार आहेत. मांझी यांच्या मुलाला मंत्री केले जाऊ शकते.