बंगळुरू - एखाद्या पाहुण्याच्या स्वागताला किंवा सन्माननीय व्यक्तीच्या सत्कारासाठी शाल, फूल, नारळ देण्याची प्रथाच पडली आहे. त्यामध्ये, राजकीय नेते, अधिकारी वर्ग किंवा आमदार, खासदार, मंत्री यांच्या स्वागताला फुलांचे मोठा बुके देऊन त्यांचं स्वागत केलं जात. मात्र, काही वेळातंच तो बुके किंवा तो हार वेस्ट (कचर) होऊन जातो. मग, हजारो रुपयांची उधळण कशासाठी असा प्रश्न अनेकदा सर्वसामान्यांना पडतो. आता, कर्नाटक राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी याबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे आपण स्वागतासाठी बुके, फुले किंवा शाल स्वीकारणार नसल्याचं त्यांनी ठरवलं आहे.
बंगळुरू येथील कांतीराव स्टेडियमवर कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाचा शपथग्रहण सोहळा पार पडला. यावेळी, राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्र्यांसह आमदारांना पदाची शपथ दिली. सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली, तर डीके शिवकुमार यांनी एकमेव उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि राज्यपालांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देण्यात आले. तसेच, अनेकांनी हार, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कारही केला. मात्र, यापुढे आपण पुष्पगुच्छ, हार, शाल स्वीकारणार नसल्याचे सिद्धरमैय्या यांनी ट्विटर अकाऊंटवरुन जाहीर केले आहे.
दरम्यान, काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकी स्पष्ट बहुमत मिळालं असून १३५ जागांसह एकहाती सत्ता आल्याने काँग्रेसने सरकार स्थापन केलं आहे. त्यात, मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. डीके शिवकुमार हेही मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसले होते. अखेर, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानंतर सिद्धरमैय्या यांचं नाव निश्चित झालं अन् त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांदा शपथ घेतली.