श्रीनगर: काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 10 दिवसांत नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे त्यांनी जम्मू-काश्मीरमधील एका जाहीर सभेत सांगितले. 73 वर्षीय आझाद यांनी रविवारी बारामुल्ला येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, 'माझ्यावर भाजपचा असल्याचा आरोप होतो, पण मी फक्त पैगंबराचा गुलाम आहे.'
ते पुढे म्हणाले, 'मी विरोधी पक्षनेता होतो, मी 4 तास मैदानावर बसून आंदोलन केले. मी कधीच धर्माच्या नावावर रक्तपात आणि मतदान होऊ देणार नाही. कलम 370 वरील माझे भाषण किमान 200 देशांनी ऐकले आहे. मी 370 वर का बोलत नाही असा आरोप माझ्यावर करण्यात आला. मी इथे मतांसाठी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी आलो नाही.'
'गेल्या 10 वर्षांपासून काँग्रेसला 50 पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाहीत. यापुढेही काँग्रेसला फार काही मिळणार नाही. मला जम्मू-काश्मीरच्या लोकांना सांगायचे आहे की, तुम्ही मला साथ द्या, मी नेहमी तुमच्यासोबत उभा राहीन. मी नसतो तर संसदेत काश्मीरचा आवाज कोणीही उठवला नसता. 1990 च्या शोकांतिकेने काश्मिरी पंडित, मुस्लिम आणि शीखांसह अनेकांचे प्राण गेले. अनेक काश्मिरी पंडितांना पळून जावे लागले. काश्मीरचे मोठे नुकसान झाले, पण आता राज्याला सुधारण्याची वेळ आली आहे,' असेही ते म्हणाले.