नवी दिल्ली : मोदी आडनावाच्या बदनामीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागण्यास पुन्हा नकार दिला आहे. या प्रकरणात दोषी ठरल्याने राहुल गांधी यांना अपात्र ठरवून त्यांचे लोकसभा सदस्यत्वही रद्द झाले होते. मी या प्रकरणात दोषी नसून, मला सुनावलेली शिक्षा स्थगित करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.
भाजपचे नेते व गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीप्रकरणी २०१९ साली खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, मी माफी मागण्यास नकार दिल्याने माझ्याबाबत गर्विष्ठसारख्या निंदाजनक शब्दांचा वापर पूर्णेश मोदी यांनी कोर्टात दाखल केलेल्या उत्तरात केला आहे. याचिकाकर्त्यास चूक नसताना माफी मागायला लावण्यासाठी लोकप्रतिनिधी कायदा व फौजदारी प्रक्रियेचा वापर केला आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नसल्याने माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.