ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. २० - 'सरबजीत' या हिंदी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मनजित सिंग रातू यांनी ही याचिका दाखल केली होती. 'सरबजीत' पाकिस्तानी तुरुंगात मरण पावलेले भारतीय सरबजीत सिंग यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट आहे.
त्यांची २०१३ मध्ये पाकिस्तानी तुरुंगात हत्या झाली होती. आज शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपट बघितल्याशिवाय बंदी घालण्याची मागणी करणारी ही याचिका म्हणजे प्रथमदर्शनी पब्लिसिटी स्टंट वाटतो असे निरीक्षण उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.के.जैन यांनी नोंदवले.
चित्रपटात आपले नकारात्मक चित्र दाखवल्याचे याचिकाकर्त्या रातूने म्हटले आहे. १९९० साली पाकिस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटासाठी रातू जबाबदार होता. सरबजीतला रातूच्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागली हा सरबजीतच्या कुटुंबियांचा दावा चुकीचा आहे असे याचिकाकर्ते मनजिंत सिंग रातू यांनी याचिकेत म्हटले होते. चित्रपटातील चित्रण वास्तवाला धरुन नाही. त्यामुळे आपल्या प्रतिमेवर परिणाम होईल असा त्यांचा दावा होता.