ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ११ - दिल्ली विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करणा-या किरण बेदी यांनी आता भविष्यात पुन्हा कधीही निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं आहे. राजकारणापेक्षा समाजसेवेत मला जास्त रस असून आता पुन्हा मी समाजसेवेत सक्रीय होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पणजी येथे महिला आर्थिक मंचाच्या कार्यक्रमात किरण बेदींनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी भाष्य केले. दिल्ली विधानसभा निवडणूक हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव होता असे सांगत बेदी म्हणाल्या, मी सक्रीय नेता नाही कारण राजकारण ही माझी भाषा नाही. यापुढे मी निवडणूक लढवणार नाही. एकीकडे निवडणूक न लढवण्याचे स्पष्ट करतानाच भाजपाचे आभार मानायला त्या विसरत नाहीत. भाजपाने मला संधी दिली, माझ्यावर विश्वास दाखवला यासाठी मी त्यांचे आभारी आहे असे बेदी यांनी नमूद केले.
दिल्ली विधानसभा निवडणूक भाजपाने किरण बेदी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या होत्या. किरण बेदी या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार होत्या, मात्र त्यांचा दारुण पराभव झाला. तसेच भाजपाला फक्त ३ जागांवर विजय मिळवता आला होता.