भाजपाच्या तिकीटवर लोकसभा लढवणार का?; सेहवाग म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 12:19 PM2019-02-09T12:19:24+5:302019-02-09T12:25:55+5:30
हरयाणातील रोहतकमधून सेहवागला उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा
चंदीगड: माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. सेहवागनं हरयाणाच्या रोहतक मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यासाठी भाजपाच्या बैठकीत चर्चादेखील झाली, असं वृत्त होतं. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं याबद्दल सेहवागशी संवाद साधण्याची आणि त्याला तिकिटाची ऑफर देण्याची जबाबदारीदेखील घेतल्याची माहिती काही प्रसारमाध्यमांनी दिली होती. त्यामुळे मैदानात गोलंदाजांची धुलाई करणारा सेहवाग राजकारणाचं मैदानदेखील गाजवणार का, असा प्रश्न अनेकांना पडला.
रोहतकमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांचं वर्चस्व आहे. हेच वर्चस्व मोडून काढण्यासाठी सेहवागला तिकीट देण्यात येणार असल्याची चर्चा रंगली होती. यावर सेहवागनं भाष्य केलं आहे. मी राजकारणात येणार, ही निव्वळ अफवा असल्याचं सेहवाग म्हणाला. मी आगामी लोकसभा निवडणूक लढणार ही फक्त आणि फक्त अफवा आहे. त्यात कोणतंही तथ्य नाही, असं सेहवागनं स्पष्ट केलं. ट्विट करुन ही माहिती सेहवागनं दिली. त्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला. सेहवागनं त्याच्या ट्विटमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणुकीचादेखील उल्लेख केला. 'गेल्या निवडणुकीवेळीही अशीच चर्चा झाली होती. मात्र तसं काही झालं नाही. आताही तशीच चर्चा सुरू आहे. मात्र त्यात कोणतंही तथ्य नाही. मला निवडणूक लढवण्यात रस नाही. त्यामुळे विषय संपला,' असं सेहवागनं ट्विटमध्ये म्हटलं.
Some things never change, like this Rumour. Same in 2014, and no innovation even in Rumour in 2019. Not interested then, not interested now. #BaatKhatam#5YearChallengepic.twitter.com/XhY7TkxfpD
— Virender Sehwag (@virendersehwag) February 8, 2019
येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपाच्या कोअर कमिटीची हरयाणात बैठक झाली. त्यावेळी रोहतकमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांचा पराभव करण्यासाठी सेहवागला तिकीट देण्यात यावं, असं मत व्यक्त केलं. त्यानंतर बैठकीत सेहवागच्या नावावर मोठी चर्चा झाली. मात्र प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनी सेहवागला उमेदवारी दिली जाणार असल्याच्या वृत्ताचं इन्कार केला होता. सेहवाग अद्याप भाजपामध्ये सहभागीदेखील झालेले नाहीत, असं त्यांनी म्हटलं होतं.