जयपूर : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ जसजशी जवळ येते आहे तसतसे या चित्रपटाविरोधातील वातावरणही तापू लागले आहे. ' पद्मावत' सिनेमाविरोधात अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असून कोणत्याही स्थितीत 'पद्मावत' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा शब्दांत करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र कालवी यांनी इशारा दिला आहे.
याप्रकरणी दोषी कोणी नसून फक्त सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दोषी आहेत. 'पद्मावत' सिनेमावर जनतेने कर्फ्यू लावावा. मी याआधी सुद्धा सांगितले होते, तेच आता पण सांगत आहे. 'पद्मावत' सिनेमा हा प्रदर्शित होऊ नये, असे लोकेंद्र कालवी म्हणाले. याचबरोबर, कोणत्याही स्थितीत 'पद्मावत' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही आणि ज्या राज्यात या सिनेमावर बंदी नाही. त्याठिकाणी जाऊन आमचे कार्यकर्ते हा सिनेमा बंद करतील, असे लोकेंद्र कालवी यांनी सांगितले.
मुंबईत सिनेमाला विरोध करणारे करणी सेनेचे 17 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात'पद्मावत' सिनेमाला विरोध करणा-या करणी सेनेच्या मुंबईतील 17 कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
'पद्मावत'ला विरोधासाठी पुण्यात वाहनांची तोडफोड, दगडफेक करून फोडल्या गाड्यापुण्यामध्येही पद्मावत सिनेमाला विरोध करण्यात आला. सिनेमाला विरोध करण्यासाठी 20 ते 25 जणांच्या जमावाने पुणे शहरातून जाणाऱ्या सातारा - मुंबई महामार्गावरील वाहनावर दगडफेक करून तोडफोड केली. या दगडफेकीत किमान 10 वाहनाचं नुकसान झालं आहे. ही घटना महामार्गावरील वडगाव पुलालगतच्या सर्व्हिस रोडवर मध्यरात्री 12 च्या सुमारास घडली.
अहमदाबादमध्ये हिंसक आंदोलन, मॉलमध्ये तोडफोड 'पद्मावत' सिनेमाविरोधात अहमदाबादमध्ये आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाने हिंसक रुप घेतलं आहे. अहमदबादमधील अल्फा आणि हिमालया मॉलमध्ये तोडफोड आणि जाळपोळीचा प्रकार समोर आला आहे. पद्मावत चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत असला तरी या चित्रपटाला सुरु असलेला विरोध कमी होण्याची चिन्हे नाहीत. या चित्रपटाला विरोध करणार्यांनी आज अहमदाबादमधील काही मॉल्समध्ये जाऊन तोडफोड केली व तीन मॉलमध्ये आग लावण्याचेही प्रकार घडले. अहमदाबादमधील हिमालयन मॉलच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांचीही नासधूस करण्यात आली. मेमनगर भागातील एका मॉलमध्येही जमावाने तोडफोड केली.