ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २५ - आरक्षण हा पटेल समाजाचा हक्क असून आम्हाला भीक म्हणून आरक्षण नको आहे, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर २०१७ मध्ये गुजरातमध्ये कमळ बहरु देणार नाही असा इशारा पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी दिला आहे. पटेल समाजाचे हित साधणारेच गुजरातमध्ये राज्य करु शकतील असेही त्यांनी म्हटले आहे.
गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरत असून २२ वर्षीय हार्दिक पटेल या समाजाचे नेतृत्व करत आहे. मंगळवारी अहमदाबाद येथे पटेल समाजाच्या आरक्षणासाठी महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत लाखो नागरिक सहभागी झाले असून या विशाल रॅलीत हार्दिक पटेलने गुजरातमधील भाजपा सरकारला इशाराच दिला आहे. गेल्या १० वर्षात गुजरातमध्ये सहा हजार शेतक-यांनी आत्महत्या केली आता आत्महत्या झाली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असेही पटेल यांनी म्हटले आहे. देशातील तरुण आंदोलनाच्या माध्यमातून हक्क मागत असेल व त्याला त्याचे हक्क मिळत नसतील तर त्यातूनच नक्षलवाद जन्माला येतो असेही पटेल यांनी नमूद केले. गुजरातमध्ये पटेल समाजाचे वर्चस्व असून गुजरातमध्ये गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच भाजपाविरोधात एवढे मोठे आंदोलन होत आहे.