जम्मू - काश्मीरमध्ये पीएम पॅकेजअंतर्गत नोकरी करत असलेल्या काश्मिरी पंडितांनी आपल्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. काश्मीरमधून पलायन करून जम्मूमध्ये आलेल्या या काश्मिरी पंडितांनी आता पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करून सरकारला सुरक्षित ठिकाणी सामावून घेण्याची मागणी केली आहे.
काश्मीरमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या टार्गेट किलिंगमुळे सर्व काश्मिरी पंडित कर्मचारी पलायन करून जम्मूमध्ये पोहोचले होते. तेव्हापासून ते त्यांच्या संरक्षणाची निश्चिती करण्याची मागणी करत सातत्याने आंदोलन करत आहेत.
हे सर्व कर्मचारी काश्मीरमध्ये पीएम पॅकेजअंतर्गत नोकरी करत आहेत. मात्र सातत्याने होणाऱ्या टार्गेट किलिंगमुळे त्यांनी काश्मीरमधून पलायन करणेच योग्य समजले. आता ते आपली नोकरी आणि जीविताच्या रक्षणासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी समावून घेण्याची मागणी करत आहेत.
काश्मिरी पंडितांनी सांगितले की, आम्हाला काश्मीरमध्ये जोपर्यंत सुरक्षित वातावरण मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही पुन्हा काश्मिरमध्ये परत जाणार नाही. तुम्ही आमच्याकडून सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काम करून घेता. मात्र ज्या प्रकारे एकवेळ ऑनलाइन काम करून घेतले जात होते. त्याच प्रकारे आम्ही आताही काम करण्यास तयार आहोत. आम्हाला जोपर्यंत सुरक्षित ठिकाणी सामावले जात नाही. तोपर्यंत आम्ही परत जाणार नाही असा पवित्रा या काश्मिरी पंडितांनी घेतला आहे.