सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- केंद्र सरकार कोणत्याही स्थितीत विद्यार्थ्यांचे ‘नीट’मुळे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्ली येथे झालेल्या भेटीत दिले. ‘नीट’प्रश्नी सकारात्मक तोडगा निघावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले की, ‘नीट’चा अभ्यासक्रम, राज्यातील ८0 टक्के विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमापेक्षा वेगळा असल्याने ‘नीट’चा आग्रह यंदा धरल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. यासाठी किमान २ वर्षे महाराष्ट्रात नीट परीक्षा नको. आवश्यकता भासल्यास केंद्राने अध्यादेश काढावा व सीईटी परीक्षा दोन वर्षे चालू ठेवाव्यात, अशी मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. >पक्षाध्यक्ष शाह व गृहमंत्र्यांशी भेटदिल्लीच्या धावत्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचीही भेट घेतली. गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार, राज्यसभेच्या ३ जागांसाठी पक्षाच्या उमेदवारांची निवड याबाबत चर्चा तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी या भेटीत शाह यांना दिली. त्यानंतर राज्यातील दुष्काळासाठी गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे २,५00 कोटींच्या अतिरिक्त रकमेची मागणी मुख्यमंत्र्यांनी केल्याचे समजते.नीट परीक्षेला विरोध करणारे खासगी शिक्षण संस्थांचे संचालक राज्याच्या सीईटी परीक्षांचा गैरफायदा घेतात. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा विकल्या जातात. राज्य सरकारची याबाबत भूमिका काय? या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, खासगी व सरकारी शिक्षण संस्थांसाठी महाराष्ट्रात एकच सीईटी असून तसा कायदाच केला आहे.