कोची : शबरीमाला येथील भगवान अयप्पा मंदिराच्या धार्मिक रूढी आणि परंपरात सरकार हस्तक्षेप करणार नाही, असे केरळचे मुख्यमंत्री ओमन चांडी यांनी रविवारी स्पष्ट केले.सध्या देशाच्या अनेक भागांत महिलांच्या मंदिर प्रवेशावरून वादळ उठले आहे. त्यातच शबरीमाला येथील अयप्पा मंदिरातही १५ ते ५० वयोदरम्यानच्या मुली-महिलांना प्रवेश देण्याबाबत चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चांडी यांचे हे वक्तव्य आले आहे. या मुद्यावर सरकारचे धोरण स्पष्ट करताना चांडी म्हणाले की, सरकार धार्मिक रूढी, परंपरा, भावना याबाबत एका मर्यादेपेक्षा जास्त हस्तक्षेप करणार नाही. शबरीमाला मंदिराबाबतही सरकारने आपली भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे.सध्या केरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची धूमधाम उडाली असून प्रचारातही हा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. शाबरीमाला येथील पुरातन अयप्पा मंदिरात १५ ते ५० वयादरम्यानच्या महिलांना प्रवेश करण्यात बंदी आहे.एका वृत्तसंस्थेशी बोलताना चांडी म्हणाले की, धार्मिक परंपरा, रूढी, धार्मिक भावना याबाबत निर्णय घेणाऱ्या व्यक्ती आहेत. याबाबतचा निर्णय त्यांनाच घेऊ द्या, सरकार त्यात हस्तक्षेप करणार नाही.दरम्यान, पुतिंगलदेवी येथील मंदिरात आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता १०९ झाली आहे. या अग्निकांडात भाजलेल्या बिजू (३५) या इसमाचा शनिवारी कोल्लम येथील इस्पितळात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. इस्पितळात अजून ४० जणांवर उपचार सुरू आहेत.
शबरीमालाच्या रूढी-परंपरांत हस्तक्षेप करणार नाही : चांडी
By admin | Published: April 25, 2016 3:46 AM