ऑनलाइन लोकमत
रंगापाडा, दि. २७ - बँकांचे कर्ज बुडवणा-यांना सोडणार नाही. श्रीमंतांनी लोकांचा पैसा लाटला. माझ्या सरकारने अशा कर्ज बुडव्यांना रोखण्यासाठी ठोस पावले उचलली त्यामुळे त्यांना घाम सुटला असून, ते पळत आहेत. पण मी तुम्हाला सांगतो बँकांचे पैसे बुडवणा-या एकालाही सोडणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आसामच्या रंगापाडामध्ये प्रचारसभेत बोलताना सांगितले.
पंतप्रधानांच्या या विधानाचा संदर्भ बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून देशाबाहेर निघून गेलेल्या विजय मल्ल्याशी आहे. विजय मल्ल्या सहजपणे देशाबाहेर निघून जाण्यासाठी विरोधकांनी नरेंद्र मोदी सरकारला जबाबदार धरले आहे.
मल्ल्यासारख्या व्यावसायिकांनी कर्ज बुडवण्यासाठी नरेंद्र मोदींनी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. काँग्रेसने त्यांचे सरकार असताना बँकांचे दरवाजे श्रीमंतांसाठी उघडले. त्यांच्या सरकारने या बँकांच्या माध्यमातून श्रीमंतांचे खजिने भरले असा आरोप मोदींनी केला.
बँकांमधून कर्जरुपी जो पैसा लुटण्यात आला तो पैसा बँकांचा नसून, या देशातील गरीबांचा पैसा आहे. ज्यांनी हा पैसा लुटला त्यांच्याकडून पै न पै वसूल करु असे आश्वासन मोदींनी दिले.