आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 12:28 PM2024-09-24T12:28:21+5:302024-09-24T12:28:41+5:30
स्थानिक लोकांनी जम्मू-काश्मीर चालवावे, केंद्राने नव्हे
सुरणकोट/नवी दिल्ली : भाजप बहुजन समाजाच्या विरूद्ध असून, त्यांनी कितीही खोटे पसरवले तरी आम्ही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही,” असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान ‘जात जनगणना हा शब्द उच्चारायलाही घाबरतात आणि त्यांना बहुजनांना त्यांचे हक्क मिळू द्यायचे नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. ‘सर्वंकष जातगणनेनंतर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा दूर होऊन प्रत्येक वर्गाला त्यांचे हक्क, वाटा आणि न्याय मिळत नाही, जातजनणनेतील माहिती भविष्यातील धोरणांचा आधार होत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असेही राहुल म्हणाले.
आपल्यासाठी हा केवळ राजकीय मुद्दा नाही, तर बहुजनांना न्याय मिळवून देणे, हे माझे आयुष्याचे ध्येय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवण्याची काँग्रेसची मागणी आहे, असे सांगणाऱ्या भाषणांचे व्हिडीओही त्यांनी पोस्ट केले आहेत.
संसदेत तुमचा आवाज बनणार, मला आदेश द्या
जम्मू-काश्मीर केंद्राने नव्हे, तर स्थानिकांनी चालवावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरला सध्याच्या विधानसभा निवडणुका झाल्यावर राज्याचा पुन्हा दर्जा बहाल व्हावा यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकणार,” अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली. पूँछ जिल्ह्यातील सुरणकोट विधानसभा मतदारसंघात झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.
ते हरवण्यासाठी एकत्र आलेत : इंजिनीअर राशीद
नॅशनल कॉन्फरन्स नेते ओमर अब्दुल्ला आणि पीपल्स कॉन्फरन्स प्रमुख सज्जाद गनी लोन हे आमच्या अवामी इत्तेहाद पार्टीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी एकत्र आले आहेत, असा दावा खासदार शेख अब्दुल राशीद ऊर्फ इंजिनिअर राशीद यांनी केला.
त्यांनी लोकसभा निवडणुकीत बारामुल्ला मतदारसंघातून या दोन्ही नेत्यांचा पराभव केला होता. त्यामुे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे.