कितीही विरोध करा, सरकार झुकणार नाही; सुधारित नागरिकत्व कायद्यावर अमित शहा ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 07:12 PM2019-12-17T19:12:44+5:302019-12-17T19:31:24+5:30
विरोधकांनी हवं तितकं राजकारण करावं; अमित शहांचा आक्रमक पवित्रा
नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन देशातलं वातावरण पेटल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अल्पसंख्यांक शरणार्थींना आमचं सरकार नक्कीच नागरिकत्व देईल. विरोधकांना राजकारण करायचं असेल, तर त्यांनी जरुर करावं. भाजपा आणि मोदी सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं शहा यांनी म्हटलं.
शरणार्थींना भारताचं नागरिकत्व मिळेल. ते भारतीय नागरिक होतील आणि देशात सन्मानानं राहतील, असं अमित शहा म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधी पक्षांकडून देशाची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. अल्पसंख्यांक समुदायातल्या कोणाही व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही. तशी कोणतीही तरतूद नव्या कायद्यात नाही, याचादेखील त्यांनी पुनरुच्चार केला.
Home Minister Amit Shah in Delhi on #CitizenshipAmendmentAct: Aapko jo rajnitik virodh karna hai wo karo, Bharatiya Janata Party ki Modi sarkar firm hai. Ye sabhi sharanarthiyo ko nagrikata milegi, vo Bharat ke nagrik banenge aur samman ke sath duniya me rahenge. pic.twitter.com/JKyTbDMx4K
— ANI (@ANI) December 17, 2019
अमित शहांनी उपस्थितांना संबोधित करताना काँग्रेसचा समाचार घेतला. मी काँग्रेसला सांगू इच्छितो की सुधारित नागरिकत्व कायदा नेहरु-लियाकत कराराचा भाग होता. मात्र ७० वर्षांपासून हा कायदा लागू होऊ शकला नाही. कारण तुम्ही कायम मतपेढीचं राजकारण केलं, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. आमच्या सरकारनं सुधारित नागरिकत्व कायदा लागू केला आहे. त्यामुळे लाखो-कोटी लोकांना देशाचं नागरिकत्व मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.
एकीकडे अमित शहा सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल अतिशय ठाम असताना दुसरीकडे विरोधकांनी हा कायदा मागे घेण्याची मागणी करत आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. दिल्ली आणि ईशान्य भारतातली परिस्थिती तणावपूर्ण असल्याचं यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी म्हटलं. या प्रकरणात राष्ट्रपतींना लक्ष घालण्याची विनंती केल्याचं गांधींनी माध्यमांना सांगितलं.