नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन देशातलं वातावरण पेटल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अल्पसंख्यांक शरणार्थींना आमचं सरकार नक्कीच नागरिकत्व देईल. विरोधकांना राजकारण करायचं असेल, तर त्यांनी जरुर करावं. भाजपा आणि मोदी सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं शहा यांनी म्हटलं. शरणार्थींना भारताचं नागरिकत्व मिळेल. ते भारतीय नागरिक होतील आणि देशात सन्मानानं राहतील, असं अमित शहा म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधी पक्षांकडून देशाची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. अल्पसंख्यांक समुदायातल्या कोणाही व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही. तशी कोणतीही तरतूद नव्या कायद्यात नाही, याचादेखील त्यांनी पुनरुच्चार केला.
कितीही विरोध करा, सरकार झुकणार नाही; सुधारित नागरिकत्व कायद्यावर अमित शहा ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 7:12 PM