ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. उरी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानी कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करणे योग्य ठरणार नाही, असे सांगत अजयने भारतात पाकिस्तानी कलाकारांना घातलेल्या बंदीला देखील पाठिंबा दर्शवला आहे. एक इंग्रजी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही भूमिका मांडली आहे. आपल्याकडून चर्चेची अपेक्षा केली जाते, त्याचवेळी सीमेवर गोळ्या झाडल्या, एकाच वेळी दोन्ही गोष्टी कशा शक्य आहेत? असा प्रश्न उपस्थित करत त्याने पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवर टीकास्त्र सोडले आहे.
माझे सिनेमे पाकिस्तानात झळकणार नसतील तर मला फरक पडत नाही, ही वेळ देशासोबत राहण्याची आहे. त्यांचे कलाकार त्यांच्या देशासोबत आहेत, ते इथे कमावतात, पण स्वतःच्या देशाची साथ देतात, अशा शब्दांत अजयने पाकिस्तानविरोधात संताप देखील व्यक्त केला आहे. अजयने मांडलेल्या भूमिकेवर त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री काजोलने ट्वीट करुन त्याचे कौतुकदेखील केले.
So proud of my husband for taking a non political and absolutely correct stand . @ajaydevgn#ProudIndian— Kajol (@KajolAtUN) October 7, 2016