ऑनलाइन लोकमत
बक्सर, दि. २६ - महाआघाडी व इतर पक्षातील नेते धर्माच्या नावावर दलित व मागासवर्गीयांना मिळालेल्या आरक्षणातील पाच टक्के आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप लावत मी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारच्या जनतेला दिले. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार निडणुकीच्या तिसरा टप्प्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून त्याआधी बक्सर येथे झालेल्या सभेत मोदी बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षण धोरणाचा फेरविचार करण्याची भूमिका मांडल्याने भाजपा चांगलीच अडचणीत सापडली असून बिहार निवडणुकीवर त्याचा परिणाम होण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. त्यामुळेच मोदींनी आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना महाआघाडीच्या नेत्यांना आरोपीच्या पिंज-यात उभं केलं. धर्म आणि संप्रदायाच्या नावावर आरक्षण देता येणार नाही, असे संविधानात स्पष्ट केलेले असतानाही काही पक्ष व नेते दलित व मागासवर्गीयांच्या आरक्षणातील पाच टक्के काढून घेण्याचा कट रचत आहेत, मात्र मी त्यांचा कट कधीच यशस्वी होऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
कोणालाही आरक्षणाला हात लावू देणार नसल्याची ग्वाही बिहारमधील जनतेला दिली.
यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. गेल्या अनेक वर्षांपासून बिहारमध्ये अनेक पक्ष , अनेक सत्तेवर येऊन गेले पण त्यांनी बिहारच्या विकासासाठी काहीच केल नाही, त्यांनी त्यांच्या कामाचा हिशोब द्यायला पाहिजे, उलट ते माझ्याकडेच हिशोब मागत आहेत. माझ्यावर टीका करण्याशिवाय, चिखलफेक करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरे काम नाही, पण चिखलातच कमळ अधिक फुलते हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना हाणला.
मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी तांत्रिकाची भेट घेतल्यावरून वाद सुरू असतानाच मोदींनी त्यांच्यावरही टीका केली. बिहारमधील आपला काळ संपला आहे, हे दोन टप्प्यातील मतदानावरून विरोधकांच्या लक्षात आले आहे आणि म्हणूनच ते आता निवडणूक जिंकण्यासाठी मंत्र-तंत्राचा आधार घेत आहेत असा चिमटा त्यांनी नीतिशकुमार यांना लगावला.