मेहसाणा : प्रेमविवाहासाठी पालकांची संमती बंधनकारक करण्याचा गुजरात सरकारचा विचार असल्याचे त्या राज्याचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी सांगितले. मात्र ही तरतूद घटनाविरोधी ठरू नये याचीही तपासणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भूपेंद्र पटेल म्हणाले की, प्रेमविवाहासाठी पालकांची संमती सक्तीची करा अशी मागणी पाटीदार समाजाने केली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने गुजरात सरकार कायदेशीर तरतूद करण्याचा विचार करत आहे. पाटीदार समाजाच्या सरदार पटेल ग्रुप या संघटनेने रविवारी मेहसाणा येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विवाह करण्यासाठी मुली घरातून पळून जातात. त्या घटनांचा अभ्यास करण्यात यावा, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री हृषीकेश पटेल यांनी मला केली. त्यातूनच विवाहासाठी पालकांची संमती बंधनकारक करण्याचा विचार सुचला, असेही भूपेंद्र पटेल म्हणाले.
रकारने धार्मिक स्वातंत्र्याबद्दलच्या कायद्यात २०२१ साली सुधारणा केली होती. बळजबरीने धर्मांतर घडविणाऱ्यांना १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात येईल अशी त्या कायद्यात तरतूद आहे. मात्र, गुजरात उच्च न्यायालयाने या कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती दिली. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.