तेजप्रताप यादव म्हणाले, माझा भाऊ तेजस्वी मुख्यमंत्री झाला तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 09:42 AM2020-02-24T09:42:31+5:302020-02-24T09:43:54+5:30
2015 मध्ये भाजपने येथे 53 जागा जिंकल्या होत्या. तर सत्ताधारी जदयूने महाआघाडीसोबत निवडणूक लढवत 71 जागांवर विजय मिळवला होता. तर राजदने 80 आणि काँग्रेसने 27 जागा जिंकल्या होत्या.
नवी दिल्ली - बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, आता आपण तेंव्हाच बासरी वाजवू ज्या दिवशी छोटे बंधू तेजस्वी यादवबिहारचे मुख्यमंत्री होतील. पटना येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सध्या मला अनेकांकडून विचारण्यात येते की, बासरी कधी वाजवणार आहे. त्यावर माझं हेच उत्तर आहे की, तेजस्वी ज्या दिवशी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होईल, त्यादिवशी मी बासरी वाजवणार आहे. आमचे शत्रू आमच्या कुटुंबाची विभागणी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र कोणीही आम्हाला एकमेकांपासून वेगळ करू शकत नाही. अनेकजण मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्यात या वर्षाच्या अखेरीस असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाच्या वतीने बेरोजगारी हटाव यात्रा काढण्यात आली आहे. तेजस्वी यादव यांनी आज येथील सभेचे नेतृत्व केले. ही यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्हातून जाणार आहे. 243 सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेची निवडणूक या वर्षी ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. 2015 मध्ये भाजपने येथे 53 जागा जिंकल्या होत्या. तर सत्ताधारी जदयूने महाआघाडीसोबत निवडणूक लढवत 71 जागांवर विजय मिळवला होता. तर राजदने 80 आणि काँग्रेसने 27 जागा जिंकल्या होत्या.