PM Narendra Modi Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा १०० वा भाग देशभरात साजरा करण्यात आला. कर्नाटक विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. कर्नाटकात सत्ता कायम राखण्याचा मोठा पेच भाजपसमोर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपचे नेते, मंत्री, मुख्यमंत्री कर्नाटकात जाऊन विविध सभांना संबोधित करत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गेल्या ४ महिन्यात तब्बल ८ वेळा कर्नाटक दौरा केला आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीचे वेधही लागले आहेत. यातच वाराणसीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारतातून निवडणूक लढवावी का, याबाबत सर्व्हे घेण्यात आला.
दक्षिण भारतात भाजप आपली संघटना मजबूत करण्यावर भर देत आहे. दक्षिण भारतात भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. याच पार्श्वभूमीवर दक्षिण भारतात एक सर्व्हे करण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारतातून लोकसभानिवडणूक लढवायला हवी का, यावर जनतेचा कौल घेण्यात आला. या सर्व्हेत जनतेने अवाक् करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्याचे सांगितले जात आहे.
PM मोदींनी वाराणसीसह दक्षिणेतून निवडणूक लढवावी का?
सीव्होटर-एबीपीने याबाबतचा सर्व्हे केला. या सर्व्हेत ४८ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारतातून निवडणूक लढवावी, असा कौल दिला आहे. या लोकांनी या सर्व्हेच्या बाजूने मत दिले आहे. दक्षिण भारतातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढवू नये, असा कौल ३३ टक्के लोकांनी दिला आहे. तर १९ टक्के लोकांनी नेमके सांगू शकत नाही, असे म्हटले आहे. या सर्व्हेत एकूण ४ हजार ८९० लोकांनी सहभाग नोंदवल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून दोनवेळा लोकसभा निवडणूक लढवली होती. ही निवडणूक पंतप्रधान मोदी यांनी मोठ्या मताधिक्याने जिंकली आहे. पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीतून निवडणूक लढवल्याचा परिणाम आजूबाजूच्या जागांवरही झाल्याचे सांगितले जात आहे. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची दक्षिण भारतावर विशेष नजर आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण भारतातून निवडणूक लढवणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"