नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशसह इतर चार राज्यांत भाजपाने दणदणीत विजय मिळवल्याने यावर्षी होणाऱ्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुका ह्या भाजपासाठी केवळ औपचारिकता उरल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र या निवडणुकीत भाजपाला कुठलाही वॉकओव्हर देण्याची विरोधी पक्षांची इच्छा नाही. त्यामुळे भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी खास रणनीती आखली असून, भाजपाकडून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संयुक्त उमेदवार उतरवण्याची तयारी विरोधी पक्षांनी सुरू केली आहे.
काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, त्यांच्या पक्षासह इतर विरोधी पक्षही आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआच्या उमेदवाराविरोधात आपला उमेदवार उभा करण्यासाठी सज्ज आहेत. तसेच एनडीएच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांवरून विरोधी पक्ष पुढील भूमिका ठरवतील. भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी जुलै आणि उपराष्ट्रपतीपदासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे.
२०१७ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांना रामनाथ कोविंद यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या एम. व्यंकय्या नायडू यांच्याविरोधात विरोधकांनी गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली होती, तेही पराभूत झाले होते. यावेळचं राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचं संख्याबळ पाहिलं तर विरोधी पक्षांचा उमेदवार निवडून येणे कठीण आहे.
राष्ट्रपतीपदासाठी निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण ५ लाख ४९ हजार ४५२ मतांपेक्षा भाजपाकडे ९ हजार मते कमी आहेत. मात्र बीजेडी आणि वायएसआर काँग्रेस हे पक्ष की कमतरता भरून काढू शकतात. तसेच काँग्रेससाठीही सर्व विरोधी पक्षांना स्वीकारार्ह ठरेल, अशा नावाची निवड करणे अवघड आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत केवळ एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत झालं होतं. तरीही डाव्या पक्षांनी त्यांच्याविरोधात कॅप्टन लक्ष्मी सहगल यांना उमेदवारी दिली होती.
दरम्यान, काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले की, भाजपाने २००७ मध्ये प्रतिभाताई पाटील यांच्याविरोधात भैरोसिंह शेखावत आणि २०१२ मध्ये प्रणव मुखर्जी यांच्याविरोधात पीए संगमा यांना उमेदवारी दिली होती.