श्रीनगर- जम्मू काश्मीर राज्य ऊर्जा विकास महामंडळातर्फे 112 वर्षे जुन्या मोहरा जलविद्युत प्रकल्पाचा हेरिटेज प्रकल्पांतर्गत विकास होण्याची शक्यता आहे. 1905 साली बांधण्यात आलेला हा प्रकल्प जम्मू आणि काश्मीर राज्यातील सर्वात जुना विद्युतप्रकल्प आहे.4 मेगावॅट ऊर्जा क्षमतेच्या या प्रकल्पाचा विकास करण्याचे उद्दिष्ट्य जम्मू आणि काश्मीर राज्य सरकारने ठेवल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. राज्याचे ऊर्जा विकासमंडळाला या प्रकल्पाची क्षमता 9 मेगावॅट करयाची असून त्याची डागडुजीही करायची आहे.
120 कोटी रुपयांच्या कामाची निविदा राज्य सरकार पुढील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये काढण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या विकास पॅकेजमधून या प्रकल्पाला निधी मिळावा यासाठी राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार आहे.मोहरा जलविद्युत प्रकल्प काश्मीरच्या उत्तर भागात असून झेलम नदीच्या डाव्या बाजूला बांधण्यात आलेला आहे. हा प्रकल्प एलओसी म्हणजे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे 11 किमी लांबीची लाकडी पन्हळ. या पन्हळीचा विविध कामांसाठी वापर केला जातो. ही पन्हळ देवदारच्या लाकडापासून तयार केली होती.
100 वर्षांहून अधिक जुन्या या प्रकल्पाच्या जीर्णोद्धारासाठी राज्याच्या ऊर्जा विकास मंडळाने हेरिटेज कॉन्झर्वेशनिस्टना आमंत्रित केले आहे. या प्रकल्पातून सिंचनासाठी आणि वीज निर्मितीसाठी पाणी वापरले जायचे. मात्र 1959 साली आलेल्या महापुरात याचे ऊर्जानिर्मिती केंद्र वाहून गेले. 1962 साली येथे 9 मेगावॅट क्षमतेचे वीज निर्मिती केंद्र उभे राहावे यासाठी काम पूर्ण झाले आणि 1992 पर्यंत हा प्रकल्प कार्यरत राहिला. पण 1992 च्या पुरामध्ये प्रकल्पाचे अत्यंत मोठे नुकसान झाले. 2004 साली प्रकल्पाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. गेली अनेक वर्षे बंद असलेला हा प्रकल्प जम्मू-काश्मीरमधील नागरिकांसाठी पुन्हा वीज घेऊन येण्याची शक्यता वाढली आहे.कावेरीवरील प्रकल्पावरून प्रेरणा-काश्मीरचे तत्कालीन महाराजा रणबीर यांना म्हैसूरच्या राजांनी कावेरी नदीवर बांधलेल्या प्रकल्पाला पाहिल्यावर मोहरा प्रकल्प बांधण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी कावेरी प्रकल्प बांधणाऱ्या मेजर लेटबिनिर यांनाच मोहरा प्रकल्पासाठी आमंत्रित केले. ब्रिटिश अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाचे कामकाज 1902 साली सुरु झाले व 1905 साली संपले. या प्रकल्पात वापरलेले जनित्र एका अमेरिकन कंपनीने तयार केले होते. घोडागाडीवर लादून जनित्रे येथे आणण्यात आली. प्रकल्पासाठी मजूर अफगाणिस्तान, पंजाब, बाल्टिस्तान, लडाखमधून आले होते. वीज निर्मितीनंतर श्रीनगर, सोपोर, बारामुल्ला आणि गुलमर्गला येथून वीज पुरवली जायची. एकेकाळी या प्रकल्पातून श्रीनगरच्या रेशमी उद्योगाला वीज पुरवली जायची. त्यावेळेस 3000 हून अधिक लोक या व्यवसायात कार्यरत होते आणि दरवर्षी 100 टन रेशमाचे उत्पादन होत असे. कुटिरउद्योगांबरोबर या प्रकल्पातून राजेसाहेबांच्या घरीही वीज येथूनच पुरवली जायची.