नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्याचा प्रस्तावावर राज्यसभेत आज चर्चा होत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करु शकतात. देशात गेल्या 72 दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर अद्यापही तोडगा निघाला नाही. केंद्र सरकारने लागू केलेल्या 3 कृषी कायद्यांना विरोध करत, हे शेतकरी आंदोलन दिल्लीच्या सीमारेषेवर सुरु आहे. यासंदर्भात कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी अनेकदा संसदेत चर्चा केली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात राज्यसभेत बोलतील, अशी शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट होईल. केंद्र सरकार या कायद्यातील बदलाला तयार आहे, पण शेतकरी आंदोलकांच्या मागणीनुसार तिन्ही कायदे रद्द करण्यास सरकार तयार नसल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. शेतकरी नेते आणि सरकारमध्ये आत्तापर्यंत तब्बल 12 वेळा चर्चा झाली आहे, पण अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यामुळे, शेतकरी आंदोलन कधी संपुष्टात येईल, हा प्रश्न सर्वांसाठीच अनुत्तरीत असा आहे.
भाजपाने 5 फेब्रुवारी रोजी राज्यसभेतील सदस्यांसाठी व्हीप जारी केला होता, भाजपाने आपल्या सर्वच खासदारांना 8 ते 12 फेब्रुवारी रोजी खासदारांना संसद सभागृहात हजर राहण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे काँग्रेसनेही सर्वच खासदारांना सोमवारी संसदेत उपस्थित राहण्याचे सांगितले होते. त्यामुळे, सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे, कारण कृषी कायद्यांना अुनुसरून सभागृहात चर्चा घडविण्याची मागणी काँग्रेसकडून वारंवार होत आहे. काँग्रेस नेते आणि पदाधिकारी शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत असून मोदी सरकारविरुद्ध रस्त्यावरही उतरताना दिसून येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी सभागृहातून काहीजण वॉकआऊट करुन आपला निषेध नोंदविण्याची शक्यता आहे. शेतकरी कायद्यावरुन विरोधी पक्ष पहिल्या दिवशीपासूनच चर्चेची मागणी करत, सभागृहात गोंधळ घालत आहे. त्यासंदर्भात 17 विरोधी पक्षांची एक बैठकही घेण्यात आली आहे. त्यामध्ये, लोकसभा सभागृहात विरोधी पक्षाने रणनिती कशी आखायची, याची चर्चा झाल्याचे समजते.
कृषी कायद्यांना विरोध ठराविकच
केंद्रीय कृषी कायद्यांना हाेत असलेला विराेध हा ठराविक भागापुरता मर्यादित असून, लवकरच काेंडी फुटेल, असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह ताेमर यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राजकारण करत असल्याचा आराेपही त्यांनी काॅंग्रेसवर केला. शेतकऱ्यांचे आंदाेलन ठराविक भागापुरते मर्यादित आहे. सरकार शेतकऱ्यांसाेबत चर्चा करण्यास तयार आहे. लवकरच काेंडी फुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ताेमर यांनी काॅंग्रेसच्या भूमिकेवरही टीका केली. सत्तेवर असताना काॅंग्रेसने शेतकऱ्यांसाठी काहीच का केले नाही?, असा प्रश्नही ताेमर यांनी केला.