नवी दिल्ली : वेतनधारी लोकांचा सणासुदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी वित्त वर्ष २०२१ चे कर्मचारी भविष्य निधीवरील (ईपीएफ) व्याज येणाऱ्या दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची तयारी कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) चालविली आहे.एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई दिलासा वाढ देण्यात येणार आहे. त्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ईपीएफचे व्याजही जमा होण्याचा योग जुळून येत आहे. कोविड-१९ साथीमुळे रोजगार गमवावा लागलेल्या, तसेच वेतन कपात सहन कराव्या लागलेल्या वेतनधारी कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळेल.
सूत्रांनी सांगितले की, २०२०-२१ या वित्त वर्षात ईपीएफवर ८.५ टक्के व्याज दर देण्यास ईएफओच्या केंद्रीय बोर्डाने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावास आता वित्त मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून, ती लवकरच मिळेल, अशी अपेक्षा आहे. ८.५ टक्के हा व्याज दर निश्चित करण्यापूर्वी अनेक घटक विचारात घेण्यात आले आहेत. सूत्रांनी सांगितले की, वित्त मंत्रालयाची मंजुरी हा केवळ औपचारिकतेचा भाग आहे, असे अनेक जण मानतात. तथापि, वित्त मंत्रालयाच्या मंजुरीशिवाय ईपीएफओ व्याज दर सदस्यांच्या खात्यावर जमा करू शकत नाही. मार्चमध्ये ईपीएफओच्या बोर्डाने ८.५ टक्के व्याज दर देण्याचा निर्णय घेतला होता. आदल्या वित्त वर्षात ईपीएओला ७०,३०० कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. यातील ४ हजार कोटी रुपये संस्थेला आपल्या समभागातील गुंतवणुकीची विक्री करून मिळाले आहेत. आमच्या बोर्डाच्या शेवटच्या बैठकीनंतर शेअर बाजार उत्तमरीत्या वाढला आहे. आम्हाला शेअर बाजारातून चांगले उत्पन्न मिळाल्यामुळे आम्हाला मोठा आधार झाला आहे.