ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 17 - केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मुख्यमंत्री अखिलेश यादवांच्या नेतृत्वाखालील गटच खरा समाजवादी पक्ष असून, पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह ‘सायकल’ वापरण्याचा अधिकारही याच गटाला आहे असा निर्णय दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ‘सायकल’साठी सुरू असलेला यादवी कलह संपुष्टात आला. यानंतर अखिलेश यादव यांचे पुढील पाऊल काय असेल याकडे लक्ष होते. आज सकाळी आपल्या निवास्थानी त्यांनी पक्षाची बैठक बोलवली होती.
सध्या मला पक्षाची मोठी जिम्मेदारी मिळाली आहे. आमचे सर्व लक्ष दुसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यावर आहे. आगामी विधानसभा निवडणूक मुलायमसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली लढणार आहे. येत्या एक ते दोन दिवसात उमेदवारांची अंतिम यादी घोषित करणार असल्याचे सपाचे नेते अखिलेश यादव यांनी सांगितले.
समाजवादीचे चिन्ह अखिलेश यादव यांना भेटल्यानंतर काँग्रेसबरोबर आघाडी होण्याबाबतच्या चर्चेला वेग आला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत जायचे की नाही याबाबत अखिलेश यादव लवकरच निर्णय घेतील असे अखिलेश यादव यांचे विश्वासू रामगोपाल यादव यांनी म्हटले आहे. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यामध्ये आघाडी करण्यासाठी दोन दिवसात बैठक होणार आहे. मात्र, आघाडी करण्यावर अखिलेश यादव यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
दुसरीकडे मुलायमसिंग यांनी लोक दलाकडे असलेले ‘शेत नांगरणारा शेतकरी’ हे चिन्ह मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. ते उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत स्वबळावर लढणार आहेत.