गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपासूनच अस्थिर असलेल्या जेडीएस-काँग्रेसच्याकुमारस्वामी सरकारसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. आज कुमारस्वामींना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मात्र, बंडखोर आमदारांनी बंगळुरूला परतण्यास नकार कळविल्याने सरकार पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. असे असताना कुमारस्वामींना काहीसा दिलासा देणारे वृत्त हाती आले आहे.
कुमारस्वामी सरकारविरोधात 13 काँग्रेस आणि 3 जेडीएसच्या आमदारांनी राजीनामे देत थेट मुंबई गाठली होती. मात्र, त्यावेळी विधानसभा अध्यक्ष उपस्थित नसल्याने त्यांचे राजीनामे मंजूर झाले नव्हते. यामुळे आपल्याला आमदार राहायचे नाही, राजीनामा मंजूर करावा अशी मागणी या बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आपण विधानसभा अध्यक्षांना केवळ राजीनाम्यांबाबत विचार करावा असे सांगू शकतो, त्यांच्यावर वेळेचे बंधन टाकू शकत नसल्याचे सांगत याचिका निकाली काढली होती. तसेच बंडखोर आमदारांना विधानसभेत हजर राहण्यासाठी जबरदस्ती करू शकत नसल्याचेही म्हटले होते.
काँग्रेस-जेडीएसनं 'ती' खेळी केल्यास महाराष्ट्रासोबतच कर्नाटकातही निवडणूक!या निर्णयामुळे बंडखोर आमदारांनी आपण मुंबईतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर तिकडे काँग्रेस आणि जेडीएसने आजच्या बहुमत चाचणीसाठी सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. तसेच विरोधक उगाचच अफवा पसरवत असून पक्षाचा व्हीप कसा टाळता येईल असे काँग्रेसचे नेते शिवकुमार यांनी सांगितले.
यानंतर बुधवारी रात्री उशिरा काँग्रेसचे बंडखोर आमदार रामलिंगा रेड्डी यांनी आपण काँग्रेसचा आमदार असून विधासभेचा दिलेला राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याकडून ठेवल्या जाणाऱ्या बहुमत चाचणीला मत देणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे काही मतांचा फरक असलेल्या कुमारस्वामी सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठवड्यात बंडखोरांपैकी एक आमदार आणि बेंगळूरु विकास महामंडळाचे अध्यक्ष एस टी सोमशेखर रातोरात विमान पकडत बेंगळुरु गाठले होते. त्यांचेही मत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास बंडखोर आमदारांची संख्या 14 वर येईल आणि भाजपाचे 107, तर काँग्रेस-जेडीएसचे 103 असे संख्याबळ होणार आहे.