कोलकाता - तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता, हे सिद्ध झाल्यास आपण राजीनामा देऊ, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालचे विरोधीपक्षनेते शुभेंदू अधिकारी यांचा दावा फेटाळला आहे. त्या बुधवारी पश्चिम बंगाल राज्य सचिवालयात पत्रकारांशी बोलत होत्या. याच वेळी, आपल्या पक्षाचे नाव अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.
शुभंदू अधिकारी यांनी मंगळवारी दावा केला होता की, निवडणूक आयोगाने टीएमसीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्यानंतर, बॅनर्जी यांनी अमित शहा यांना फोन करून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी यानी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधताना, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते (भाजप) 200 हून अधिक जागा जिंकू शकणार नाहीत, असा दावाही केला आहे.
ममता म्हणाल्या, ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांचा मुलगा सुभ्रांशूने वडिलांच्या बेपत्ता झाल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. याची राज्य प्रशासन दखल घेईल. मुकुल रॉय यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, रॉय हे स्मृतिभ्रंश आणि पार्किन्सन आजाराने ग्रस्त आहेत. बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर मुकुल रॉय हे दिल्लीत नाट्यमय पद्धतीने समोर आले होते. तसेच दावा केला की, ते ‘भाजप खासदार आणि आमदार' आहेत आणि त्यांची अमित शाह यांना भेटण्याची इच्छा आहे.
बॅनर्जी म्हणाल्या, 'मुकुल रॉय हे भाजपचे आमदार आहेत आणि जर त्यांना दिल्लीला जायचे असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे.' मुकुल रॉय यांनी 2021 ची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक टीएमसीशी फारकत घेत भाजपच्या तिकीटावर जिंकली होती. पण नंतर ते पुन्हा ममतांकडे गेले.