Congress Robert Vadra: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. पण, काँग्रेसनेही आपले बहुतांश उमेदवार जाहीर केले आहेत. पण, अद्याप त्यांनी आपल्या प्रतिष्ठेच्या असलेल्या अमेठीतून उमेदवार जाहीर केलेला नाही. अशातच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी अप्रत्यक्षपणे अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
वृत्तसंस्थआ एएनआयला दिलेल्या मुलाखतीत रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, गांधी घराण्यातील एखाद्या व्यक्तीने पुन्हा निवडणूक लढवायला हवी, अशी अमेठीच्या लोकांची इच्छा आहे. मी राजकारणात उतरलो तर अमेठीतून निवडणूक लढवावी, अशी त्यांची इच्छा आहे. स्मृती इराणी यांच्या कामाबद्दल लोक नाराज आणि दुखी आहेत. जनतेला पुन्हा गांधी घराण्यातील एखादा व्यक्ती खासदार म्हणून हवाय.
रायबरेली, अमेठी आणि सुलतानपूरमध्येही गांधी कुटुंबाने वर्षानुवर्षे कष्ट केले आहेत. अमेठीतील जनता विद्यमान खासदारावर नाराज आहे. स्मृती इराणी यांना विजयी करुन आपण चूक केल्याचे अमेठीच्या जनतेला कळून चुकले आहे. गांधी घराण्यातील सदस्याने येथून निवडणूक लढवावी, अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळेच ते माझ्याकडे आशेने पाहत आहेत. गांधी घराण्यातील असोत किंवा इतर कोणी असो, स्मृती इराणींनी जे कले नाही, ते काम उमेदवाराला करावे लागेल.
माझा अमेठीशी 1999 पासून संबंध आहेत. त्यावेळी प्रियांकासोबत मी तिथल्या प्रचारात सहभागी झालो होतो. राजकारणात माझी ती सुरुवात होती. त्यावेळी तेथील राजकारण वेगळ्या स्वरूपाचे होते. मला आठवते की, मी प्रचारादरम्यान रात्रभर पोस्टर्स लावायचो. आजही मी अमेठीच्या लोकांच्या हृदयात आहे. तिथून लोक मला संदेश पाठवतात, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, असेही ते यावेळी म्हणाले.