लोकसभा निवडणुक २०२४ साठी आतापासून हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. आगामी २०२४ च्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला घेरण्यासाठी विरोधी पक्ष रणनीती आखत आहेत. भारतातील विरोधी ऐक्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी वॉशिंग्टनमध्ये म्हटले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजुट भाजपचा पराभव करेल. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार वेगवेगळ्या पक्षांच्या भेटीगाठी घेत आहेत. विरोधकांकडून रणनीती आखण्यासाठी बिहारमध्येही बैठका होत आहे. एकत्र लढल्यास भाजपचा पराभव होऊ शकतो, असे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून बोलले जात आहे.
२०२४ साठी रणनीती तयार केली जात आहे परंतु २०१९ च्या निवडणुकांचा निकाल पाहिल्यास, ही लढत फक्त भाजप विरुद्ध इतर पक्षांमध्ये नव्हती. निकालांचे विश्लेषण केल्यास अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचेच वर्चस्व असल्याचे समोर येते. तिकडे काँग्रेस आणि भाजप मुख्य फ्रेममध्ये नसल्याचे दिसते. तसेच अनेक जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्येच थेट लढत झाली आहे. लोकसभेच्या ५४३ जागांचे संपूर्ण गणित खालील पाच बाबींमध्ये समजून घेऊया.
भाजप विरूद्ध कॉंग्रेस (१६१ जागा)१२ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकसभेच्या एकूण १६१ जागा आहेत. इथं भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत पाहायला मिळाली होती. १४७ जागांवर दोन्ही राष्ट्रीय पक्षांमध्येच थेट लढत होती. दुसरीकडे प्रादेशिक पक्षांनी १२ जागांवर राष्ट्रीय पक्षाला आव्हान दिले होते. केवळ २ जागांवर प्रादेशिक पक्षांमध्ये लढत झाली होती. त्यात मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, आसाम, छत्तीसगड, हरयाणा या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये भाजपने १४७ जागा जिंकल्या, तर काँग्रेसला ९ आणि इतर पक्षांचे ५ खासदार निवडून आले.
भाजप विरूद्ध प्रादेशिक पक्ष (१९८ जागा)उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या ५ राज्यांमधील १९८ जागांमध्ये बहुतांश ठिकाणी भाजप आणि प्रादेशिक पक्षांमध्ये लढत झाली. १५४ जागांवर भाजप आणि प्रादेशिक पक्षांमध्ये थेट लढत होती. २५ जागांवर काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमध्ये लढत होती. तर १९ जागांवर प्रादेशिक पक्षांमध्येच लढत झाली. बंगालमधील ४२ पैकी ३९ जागांवर भाजप पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर होता. मागील निवडणुकीत भाजपने इथे ११६, काँग्रेसने ६ आणि इतरांनी ७६ जागा जिंकल्या होत्या.
कॉंग्रेस विरूद्ध प्रादेशिक पक्ष (२५ जागा) २०१९ च्या निवडणुकीत, केरळ, लक्षद्वीप, नागालँड, मेघालय आणि पुद्दुचेरीमधील २५ पैकी २० जागांवर काँग्रेस पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहिली. या जागांवर सत्ताधारी भाजपला चमक दाखवता आला नाही. केरळमध्ये फक्त एक जागा होती जिथे भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसने इथे १७ जागा जिंकल्या, तर इतरांना ८ जागा मिळाल्या.
इथे कोणाचाही विजय शक्य (९३ जागा) दरम्यान, लोकसभेच्या जागांवर प्रभाव पाडणारी ६ राज्ये अशी आहेत, जिथे कोणताही पक्ष बाजी मारू शकतो. भाजप, काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष ९३ जागांवर मजबूत दिसत आहेत. महाराष्ट्र हे याचे उत्तम उदाहरण आहे, जिथे भाजप आणि काँग्रेस दोन्ही राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांसोबत युतीत लढतात. या ९३ जागांपैकी सत्ताधारी भाजपला मागील निवडणुकीत ४०, इतर पक्षांना ४१ आणि काँग्रेसला १२ जागा मिळाल्या होत्या.
फक्त प्रादेशिक पक्षांचा दबदबा (६६ जागा) तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मिझोराम आणि सिक्कीममध्ये लोकसभेच्या ६६ जागा आहेत, जिथे फक्त प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व आहे. तामिळनाडूतील ३९ जागांपैकी केवळ १२ जागांवर काँग्रेस किंवा भाजपला किरकोळ पाठिंबा असल्याचे दिसले आहे. या जागांवर प्रादेशिक पक्षांनी ५८ तर काँग्रेसने ८ जागा जिंकल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे सत्ताधारी भाजपला खाते देखील उघडता आले नाही.