तिरुअनंतपुरम: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीत लाभदायक ठरू शकतील, अशी समीकरणं जुळवण्यासाठी पक्षांच्या थिंक टँक कामाला लागल्या आहेत. भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केरळमध्ये तीन-चार मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. सबरीमाला कर्म समितीच्या बॅनरखाली हे उमेदवार निवडणूक लढवतील.1987 मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील हिंदू मुन्नानी संघटनेनं केरळमध्ये काही ठिकाणी उमेदवार दिले होते. राज्यातील सहा मतदारसंघात हिंदू मुन्नानीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. याशिवाय इतर मतदारसंघांमध्येही त्यांनी एलडीएफ आणि यूडीएफचा चांगली टक्कर दिली होती. काही महिन्यांपूर्वीच केरळच्या सबरीमाला मंदिराचा वाद प्रचंड गाजला होता. या मंदिरात 10 ते 50 वर्षे वयाच्या महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयानं सर्व वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेशाचा अधिकार असल्याचा निकाल दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतरही सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश करण्यास असलेला विरोध कायम आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपानं आक्रमक भूमिका घेतली होती. ज्या निर्णयाची अंमलबजावणी शक्य नाही, असे निर्णय न्यायालय देतच कशाला, असा सवाल भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी उपस्थित केला होता. केरळमध्ये हिंदूंचं प्रमाण लक्षणीय असल्यानं भाजपानं ही भूमिका घेतली. त्यातच आता रेडी टू वेट ही मोहीम जोर धरु लागली. मंदिर प्रवेशासाठी आम्ही वाट पाहायला तयार आहोत, अशी भूमिका या मोहिमेतून महिलांनी मांडली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
'हे' मंदिर भाजपाला फळणार? लोकसभा निवडणुकीत दक्षिणद्वार उघडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 2:01 PM