काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि युवा नेते सचिन पायलट यांच्या गटांमध्ये सत्तेसाठी जोरदार शितयुद्ध सुरू आहे. त्यातून राज्यात काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वाद वेळोवेळी उफाळून येत असतात. सचिन पायलट हे भाजपामध्ये जाणार असल्याचीही चर्चा सुरू असते. दरम्यान, याबाबत भाजपाचे नेते सुधांशू त्रिवेदी यांना विचारले असता त्यांनी सूचक असं उत्तर दिलं आहे.
लोकमत संसदीय पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीचा (वर्ष २०२२) पुरस्कार वितरण समारंभ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १४ मार्चला दिल्लीत होत आहे. या पुरस्कार वितरण समारंभापूर्वी, तेलंगणा सरकारच्या सहकार्याने 'लोकमत नॅशनल कॉनक्लेव्ह' होत आहे. 'भारतीय लोकशाही : परिपक्वतेच्या किती जवळ' (इंडियन डेमोक्रसी : हाऊ क्लोझ टू मॅच्युरिटी) या विषयावर विविध राजकीय पक्षातील ज्येष्ठ नेते आपले विचार मांडत आहेत. या सोहळ्यामध्ये राजस्थानमधील राजकीय परिस्थिती आणि सचिन पायलट यांच्याबाबत विचारचे असता सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा प्रचंड विजय होईल. तसेच भाजपाचे सरकार स्थापन होईल.
दरम्यान, त्या सरकारमध्ये सचिन पायलट असतील का, असा प्रतिप्रश्न केला असता सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितले की, पायलट कुठल्या एलओसीमध्ये आहेत, हे वरचा पायलटच चांगल्या पद्धतीने पाहू शकतो. खालून पाहणाऱ्याला अंदाज वर्तवणे कठीण आहे. मात्र वरच्याला माहिती आहे तो कुठे जाईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला.
यावेळी घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी महत्त्वाचं विधान केलं. २० वर्षांनंतर भाजपाचं नेतृत्व कुणाकडे असेल, हे कुणी सांगू शकत नाही. मात्र जे पक्ष आम्हाला विरोध करत आहेत ते राजकारणा टिकून राहिले तर त्यांचं नेतृत्व यांचे कुटुंबीयचं करतील, असा टोला त्रिवेदी यांनी लगावला.