ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी यांच्यापासून वाचवण्यासाठी मी आलो असून स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे अशी टीका राहूल गांधींनी भाजपावर केली आहे. संसदेचं अधिवेशन अनिश्चित कालावधीसाठी तहकूब झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहूल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर हल्ला चढवला.
ललित मोदी प्रकरणात सुषमा स्वराज यांच्या कुटुंबियांनी किती पैसे घेतले आणि त्यांनी कथित मानवतावादी मदत गुपचूप का केली या प्रश्नांची उत्तरे मिळाली नसल्याचेही राहूल म्हणाले. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्युटवर गजेंद्र चौहान यांची नेमणूक असो की याकूबच्या अंत्ययात्रेचे चित्रीकरण केल्याप्रकरणी वृत्तवाहिन्यांना धाडण्यात येणा-या नोटीसा असोत सरकार RSS चा अजेडा राबवत असल्याचा आरोप राहूल गांधी यांनी केला आणि देशाला RSS व देशाला नरेंद्र मोदींपासून आलो असल्याचा दावा केला.
दरम्यान, लोकसभेचे पावसाळी सत्र संपूर्णपणे फुकट गेले असून एकही दिवस कामकाज झाले नाही आणि वस्तू व सेवा कर, जमीन अधिग्रहण विधेयक आदी महत्त्वाची विधेयके संमत होऊ शकली नाहीत. वेगवेगळ्या कारणांवरून लोकसभेमध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केल्यानंतर संसदेचे कामकाज अनिश्चित कालावधीसाठी तहकूब करण्यात आले.
ललित मोदीप्रकरणावरून हा सगळा गोंधळ झाला असताना अजूनही वेळ गेली नसून मोदींनी ललित मोदीना भारतात आणावं व त्यांच्यावर खटला चालवावा असं आवाहन राहूल गांधींनी केलं अन्यथा नरेंद्र मोदी घाबरले असंच म्हणावं लागेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली.