"बायडेन यांची मदत घेणार, काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करणार" काँग्रेस नेत्याची मुक्ताफळे
By बाळकृष्ण परब | Published: November 11, 2020 10:34 AM2020-11-11T10:34:20+5:302020-11-11T10:39:01+5:30
Article 370 News : नॅशनल कॉन्फ्रन्स, पीडीपी यांनी गुपकारच्या माध्यमातून कलम ३७० साठी आवाज उठवला असतानाचा काँग्रेसच्या काश्मीरमधील एका नेत्याने या मुद्द्यावरून मुक्ताफळे उधळली आहेत.
नवी दिल्ली - गेल्या वर्षी केंद्र सरकारने रद्द केलेल्या कलम ३७० वरून गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा वातावरण तापू लागले आहे. एकीकडे नॅशनल कॉन्फ्रन्स, पीडीपी यांनी गुपकारच्या माध्यमातून कलम ३७० साठी आवाज उठवला असतानाचा काँग्रेसच्या काश्मीरमधील एका नेत्याने या मुद्द्यावरून मुक्ताफळे उधळली आहेत. अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडेन यांच्या झालेल्या विजयाचा आधार घेत काँग्रेसचे काश्मीरमधील नेते जहांजेब सिरवाल म्हणाले की, आम्ही बायडेनच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणून जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० आणि कलम ३५ अ लागू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
आपल्या व्हिडीओ संदेशामध्ये जहांजेब सिरवाल म्हणाले की, अमेरिकेमध्ये जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा झालेला विजय हा लोकशाहीचा विजय आहे. याचा परिणाम भारतीय राजकारणावरसुद्धा होणार आहे. तसेच जम्मू काश्मीरच्या राजकारणावरही याचा सकारात्मक परिणाम होईल. सध्या संपूर्ण जगात इस्लामोफोबियाची दहशत पसरवली जात आहे. त्यामध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते. तसेच बायडेन भारत सरकारवर दबाव आणतील त्यानंतर कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याबाबत निर्णय होऊ शकतो.
दरम्यान, काँग्रेससुद्धा पीपल्स अलायन्सचा भाग असून, जिल्हा विकास परिषदेची निवडणूक एकत्र लढणार असल्याचा दावा जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी रविवारी केला होता. जम्मू काश्मीर काँग्रेसचे प्रमुख जी.ए. मीर यांनी काँग्रेस जिल्हा विकास परिषदेची निवडणूक एकत्र येऊन लढेल, असे मला सांगितले असे फारूख अब्दुल्ला म्हणाले होते.
फारुख अब्दुल्लांनी केलेल्या दाव्याबाबत मीर म्हणाले की, सर्व निवडणुका एकत्र होत आहेत. तसेच वेळसुद्धा कमी आहे. पक्षाने अद्याप उमेदवार निश्चित केलेले नाहीत. स्वबळावर निवडणुका लढवण्याचा विचार सुरू आहे. मात्र काही ठिकाणी आघाडी करून निवडणूक लढवण्यात येईल.