नागपूर : चंद्रयान-३ मिशन यशस्वी ठरल्यानंतर भारत अवकाशात आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्याच्या तयारीत आहे. गगनयान मोहीम सुरू केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्राे) ने २०३५ पर्यंत देशातील पहिले अंतराळ स्टेशन स्थापन करण्याची आणि २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याची योजना आखली आहे. यासाठी इस्राेने तयारी सुरू केली असल्याची माहिती चंद्रयान-३ मोहिमेचे प्रकल्प संचालक पी. वीरामुथुवेल यांनी दिली.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये (व्हीएनआयटी) गुरुवारी ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी विज्ञान कार्यक्रम कार्यालयाचे संचालक डॉ. तीर्थ प्रतिम दास, व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रेमलाल पटेल उपस्थित होते. पी. वीरामुथुवेल यांनी सांगितले की, २०२३ मधील इस्रोची चंद्रयान-३ मोहीम चंद्रावर मानव उतरण्याच्या मोहिमेत मोठे पाऊल ठरले. चंद्राबाबत जगभरातील देशांची उत्सुकता वाढली आहे. आता चंद्रावर मानव उतरवण्यासाठी स्पर्धा आहे.
अंतराळवीर १५ दिवस चंद्रावर राहू शकणार?मानवी चंद्र मोहिमेसाठी प्राथमिक काम सुरू झाले आहे. भारताच्या ‘स्पेस स्टेशन प्रोग्राम’मध्ये अंतराळवीरांना १५ ते २० दिवस कक्षेत राहू देण्याची योजना आहे. सध्या ते संकल्पनात्मक टप्प्यात आहे, असे पी. वीरामुथुवेल यांनी सांगितले.
अमेरिका चीनबरोबर भारतही मागे नाहीजगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. यात आता भारतही मागे राहिलेला नाही. अमेरिका, चीन या देशांनी २०३६ पर्यंत चंद्रावर आपला तळ ठोकण्याची तयारी चालविली आहे. भारतानेही अशा प्रकल्पाची घोषणा केली असून २०४० पर्यंत चंद्रावर माणूस पाठवण्याची ‘इस्रो’ची माेहीम आहे.