कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये 'जय श्री राम' या घोषणांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. यावरुन केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाना साधला असून त्यांच्यासाठी 'मुन्नाभाई' फॉर्म्युला वापरणार आहेत.
ममता बॅनर्जी एक अनुभवी नेता आहेत, मात्र 'जय श्री राम'च्या घोषणेवरुन त्यांचा व्यवहार असामान्य आणि विचित्र आहे. राज्यातील भाजपाचा प्रदर्शनामुळे ममता बॅनर्जी चकित झाल्या आहेत. त्यांनी काही दिवसांसाठी ब्रेक घेतला पाहिजे. आसनसोल लोकसभा मतदारसंघातील जनता त्यांना 'गेट वेल सून'चे कार्ड पाठविणार आहे, असे बाबुल सुप्रियो यांनी म्हटले होते.
बाबुल सुप्रियो यांनी सोमवारी मीडियाशी चर्चा केली. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर भाष्य केले. ते म्हणाले,'' त्या एक अनुभवी नेता आहेत. मात्र त्यांचा व्यवहार असामान्य आणि विचित्र आहे. ज्या पदावर त्या आहेत, त्याची प्रतिष्ठा लक्षात घेतली पाहिजे. त्यांनी काही दिवसांसाठी ब्रेक घेतला पाहिजे. बंगालमधील भाजपाचा प्रदर्शनामुळे त्या चकित झाल्या आहेत.''
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये 'जय श्री राम' च्या घोषणांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. 'जय श्री राम'च्या घोषणा देणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर ममता बॅनर्जी भडकल्या असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी यांना याप्रकरणी चोख प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडून 'जय श्री राम' लिहलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवले जाणार आहेत. तर, ममता बॅनर्जी यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असा टोला भाजपाकडून लगावण्यात आला आहे.