नवी दिल्ली - झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी आपला झारखंड विकास मोर्चा (जेव्हीएम) पक्ष भाजपमध्ये विलीन केला. केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्या खेळीमुळेच हे शक्य झाले असून त्यांच्या या कृतीचे काँग्रेसनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी कौतुक केले आहे. तसेच मरांडी यांच्या घरवापसीमुळे 14 वर्षांचा वनवास समाप्त झाल्याचे उद्गार सिन्हा यांनी काढले. त्यामुळे आता शत्रुघ्न सिन्हा देखील भाजपमध्ये घरवापसीच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
सिन्हा यांनी ट्विट करून अमित शाह यांचे कौतुक केले. तसेच शाह यांना मास्ट्रर स्ट्रॅटर्जिस्ट संबोधले आहे. जबरदस्त व्यक्तमत्व, इमानदार, विश्वासू आणि नेतृत्वकुशल बाबूलाल मरांडी यांना परत भाजपमध्ये आणून शाह यांनी मास्टरस्ट्रोक लगावल्याचे सिन्हा म्हणाले. मरांडी यांनी 2006 मध्ये भाजप सोडून जेव्हीएम पक्ष स्थापन केला होता.
बिहारमधील निवडणुकीशी कनेक्शनभाजपमध्ये बंडखोरी केल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रसमध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजपच्या बाबतीत सिन्हा कायमच सॉफ्ट दिसून आले. त्यामुळे बाबुलाल मरांडी यांच्यानंतर सिन्हाही घरवापसी करणार का, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. काँग्रेसमध्ये गेल्यापासून सिन्हा राजकारणापासून दुरावले आहेत. त्यातच या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणूक आहे. अशा स्थितीत सिन्हा यांची भाजपमध्ये वापसी करणे शक्य असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.