नवी दिल्ली: राज्यात तीन पक्षांचं सरकार असताना सध्या शिवसेना आणि काँग्रेसची जवळीक वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची सातत्यानं भेट घेणारे शिवसेना खासदार संजय राऊत आज दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या भेटीसाठी पोहोचले. त्यानंतर सध्याच्या राजकीय घडामोडींविषयी राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुढील लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. राहुल यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली. विरोधकांच्या आघाडीसाठी राहुल यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन मी त्यांना केलं, अशी माहिती राऊत यांनी दिली. विरोधकांनी एकत्रित यावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे, असं राहुल यांना सांगितल्याचं राऊत म्हणाले.
शिवसेना काँग्रेसप्रणित यूपीएचा भाग होणार का, असा सवाल पत्रकारांनी राऊत यांना विचारला. त्यावर मी आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेईन आणि त्यानंतर याविषयी बोलेन, असं राऊत म्हणाले. काँग्रेसशिवाय विरोधी पक्षांची आघाडी शक्य नाही. विरोधकांचा चेहरा कोण असेल यावर चर्चा होऊ शकते, असं राऊत यांनी म्हटलं. राहुल गांधी लवकरच मुंबईला भेटू शकतात, असंही त्यांनी सांगितलं.
गेल्याच आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी बॅनर्जींनी यूपीए आहे कुठे असा सवाल करत काँग्रेसला डिवचलं. त्यावर काँग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी होऊ शकत नाही. दोन-तीन आघाड्या झाल्या तर त्या पर्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे विरोधकांची एकच आघाडी असायला हवी, असं राऊत म्हणाले. ममता बॅनर्जी काँग्रेसचं नेतृत्त्व मान्य करायला तयार नाहीत. त्यांची समजूत कोण घालणार, असं विचारलं असता, त्यासाठी पवार पुरेसे आहेत, असं उत्तर राऊत यांनी दिलं.