नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत ते दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले होते. आता राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते रायबरेली मतदारसंघातून आपली खासदारकी कायम ठेवणार आहेत. तर काँग्रेसने प्रियंका गांधी यांना वायनाडमधून पोटनिवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गांधी परिवारातील आणखी एक सदस्य दक्षिणेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
गांधी घराण्याचे दक्षिणेशी जुने नाते आहे. इंदिरा गांधी यांनी १९७८ मध्ये कर्नाटकातील चिकमंगळूरमधून पोटनिवडणूक जिंकली होती. यानंतर १९८० मध्ये इंदिरा गांधी यांनी आंध्र प्रदेशातील मेडक मतदारसंघातून विजय मिळवला होता. १९९९ मध्ये सोनिया गांधींनीही दक्षिणेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९९९ मध्ये सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी आणि कर्नाटकातील बेल्लारी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही जागा जिंकल्या होत्या. मात्र, नंतर त्यांनी बेल्लारीची जागा सोडण्याचा निर्णय घेतला होता.
आता प्रियंका गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर या जागेवरून भाजप कोणाला उमेदवारी देणार, याची चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात रंगली आहे. वायनाडमधून भाजप नेत्या स्मृती इराणी यांना उमेदवारी देऊ शकते, अशीही सुरु चर्चा आहे. दरम्यान, स्मृती इराणी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून केएल शर्मा यांच्याकडून पराभूत झाल्या. मात्र २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीतून राहुल गांधी यांचा पराभव केला होता. अशा स्थितीत भाजप त्यांना वायनाड जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधींविरोधात लढवली होती निवडणूक यापूर्वीही भाजपने उमेदवारी तिकिटांबाबत आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. सोनिया गांधींना १९९९ मध्ये बेल्लारीतून काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यानंतर भाजपने याच जागेवरून सुषमा स्वराज यांना तिकीट देऊन निवडणूक चुरशीची बनवली होती. या जागेवर सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी यांना कडवी टक्कर दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. सोनिया गांधींना ४१४००० मते मिळाली होती. तर सुषमा स्वराज यांना साडेतीन लाखांहून अधिक मते मिळाली होती. सोनिया गांधींना ही निवडणूक जवळपास ५६००० मतांनी जिंकता आली.