नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची काँग्रेस पक्षात नेमकी काय भूमिका राहील, या संदर्भात काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा पूर्णत्वाच्या मार्गावर असून, आता यावर अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी घेणार आहेत, हे स्पष्ट झालेआहे.गेल्या शनिवारपासून प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी व काँग्रेस नेत्यांशी तीन वेळा चर्चा केली. २०२४ मध्ये काँग्रेसची रणनीती कशी राहावी व कोणत्या मतदारसंघांवर काँग्रेसने भर द्यावा, यावर शनिवारी त्यांनी विस्तृत प्रेझेन्टेशन दिले होते. प्रशांत किशोर यांनी केलेल्या सादरीकरणावर बहुतेक काँग्रेस नेत्यांनी सहमती दर्शविलीआहे. प्रशांत किशोर यांची काँग्रेसमध्ये नेमकी काय भूमिका राहील, यावर खरा पेच आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये सामील व्हावे, हा काँग्रेस नेत्यांचा प्रस्ताव आहे. कारण प्रशांत किशोर टीआरएस (तेलंगणा), वायएसआरसीपी (आंध्रप्रदेश), टीएमसी (पश्चिम बंगाल) या पक्षांसोबत काम करीत आहेत. या राज्यांमध्ये काँग्रेसची या पक्षांशी थेट लढत आहे. काँग्रेसमध्ये सामील झाल्यास प्रशांत किशोर काय भूमिकेत राहतील, यावर निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना दिल्याचे समजते. प्रशांत किशोर यांची अनेक ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा झाली. मंगळवारी झालेल्या चर्चेच्या वेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह सामील झाले होते.
२ मेपूर्वी अंतिम निर्णय -- प्रशांत किशोर यांनी २ मेपूर्वी निर्णय जाहीर करू, असे स्पष्ट केले आहे. यामुळे २ मेपूर्वी काँग्रेस पक्षाला निर्णय घ्यावा लागेल.राहुल गांधी विदेशात- काँग्रेसचे नेते राहुल गांधी मंगळवारी झालेल्या बैठकीला अनुपस्थित होते. ते विदेशात गेले आहेत.- प्रशांत किशोर यांच्या प्रेझेन्टेशनला त्यांनी सहमती दर्शविली असल्याचे समजते.