ललित झांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, लखनौ: उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यात २० मे रोजी १४ मतदारसंघात १४४ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी व संरक्षण मंत्री राजनाथसिंग हे प्रमुख उमेदवार आहेत. राहुल गांधी पहिल्यांदाच रायबरेलीतून लढत असल्याने साऱ्या देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे आहे. काॅंग्रेसचा गड राखण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. यावेळचे वैशिष्ट्य हे की इंडिया आघाडीमुळे समाजवादी पार्टी व काँग्रेस सोबत आले आहेत. त्यामुळे मतविभाजन टळणार असून, भारतीय जनता पक्षाला जोर लावावा लागणार आहे.
मिश्रिख मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार अशोक रावत पुन्हा रिंगणात आहेत. हरदोइला भाजप जयप्रकाश यांच्या माध्यमातून हॅट्ट्रीकच्या प्रयत्नात आहे.
ब्राह्मण मतदारांची भूमिका निर्णायक
जयप्रकाश स्वतः पाचव्यांदा खासदारकीवर नजर ठेवून आहेत. त्यांची लढत सोपी नाही. कारण तीनवेळच्या खासदार सपाच्या उषा वर्मा व बसपाचे भीमराव आंबेडकर हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. ब्राह्मण मतदार निर्णायक भूमिका बजावणार असलेल्या धौरहरा मनदारसंघात भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष रेखा वर्मा यांचा सामना अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय आनंदसिंह भदोरिया यांच्याशी आहे.
तीन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला...
शहाजहांपूर येथे भाजप हॅट्ट्रीक साधण्याच्या प्रयत्नात आहे. उत्तर प्रदेशातील तीन मंत्री, सुरेशकुमार खन्ना, जितिन प्रसाद, जेपीएस राठौड हे ह्याच जिल्ह्यातील असल्याने त्यांनी ही लढत प्रतिष्ठेची बनवली आहे. इटावामध्ये तिरंगी लढत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत तर लखीमपूर मतदारसंघातून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा रिंगणात आहेत. त्याच्यासमोर सपातर्फे उत्कर्ष वर्मा व बसपा तर्फे युवा उमेदवार अंशयसिंह कालरा आहेत. फारूखाबादमध्ये भाजपचे मुकेश राजपूत यांची लढत नवल किशोर शाक्य यांच्याशी आहे. ही लढत जिंकली तर राजपूत हेसुद्धा हॅट्ट्रीक साजरी करतील. राजपूत, ओबीसी व ब्राह्मण मतदार कुणाला साथ देतात यावर जय-पराजय ठरणार आहे.