ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 06:59 AM2024-05-08T06:59:48+5:302024-05-08T07:01:02+5:30
Haryana Political Crisis: भाजपचे नायब सिंह सैनी सरकार अडचणीत, आधीच लोकसभेच्या जागावाटपावरून जेजेपीसोबतची युती भाजपाने तोडली होती. त्यांचे १० आमदार होते ते सत्तेतून बाहेर पडले होते.
बलवंत तक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : लोकसभा निवडणुकीपूर्वी हरयाणातील तीन अपक्ष आमदारांनी नायब सिंह सैनी सरकारला मोठा धक्का दिला आहे. नीलोखेडीचे आमदार धर्मपाल गोंदर, दादरीचे आमदार सोमवीर सिंह सांगवान आणि पुंडरीचे आमदार रणधीर सिंह गोलन यांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढला व ते काँग्रेससोबत गेले आहेत. राज्य सरकारकडून उपेक्षा होत असल्याने पाठिंबा काढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बादशाहपूरचे अपक्ष आमदार राकेश दौलताबाद पत्रकार परिषदेला येणार असल्याची चर्चा होती. मात्र, ते रोहतकला पोहोचले नाहीत. अपक्ष आमदार बलराज कुंडू हेही भाजप सरकारसोबत नाहीत. आधीच लोकसभेच्या जागावाटपावरून जेजेपीसोबतची युती भाजपाने तोडली होती. त्यांचे १० आमदार होते ते सत्तेतून बाहेर पडले होते. यानंतर भाजपाने नवीन मुख्यमंत्री राज्याला दिले होते. हरयाणामध्ये २५ मे रोजी सर्व जागांवर लोकसभा निवडणूक होत आहे. यापूर्वीच भाजप अल्पमतात आल्याने तेथील वारे काँग्रेसच्या दिशेने फिरण्याची शक्यता आहे.
पक्षीय बलाबल
सदस्य संख्या ९०
विद्यमान आमदार ८८
बहुमतासाठी आवश्यक ४५
भाजपकडे ४३ आमदार (भाजपचे ४० आणि २ अपक्ष व हलोपाच्या एका आमदाराचा पाठिंबा.)
काँग्रेसकडे ३३ आमदार (काँग्रेसचे ३० आणि तीन अपक्ष)
राष्ट्रपती राजवट लागू करा : भूपेंद्र सिंह हुड्डा
राज्यातील भाजप सरकार अल्पमतात आले आहे. राज्याचा कारभार चालविण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. अशी मागणी विरोधी पक्षनेते भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी मंगळवारी केली आहे.