Himachal Pradesh Government ( Marathi News ) : राज्यसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान काल हिमाचल प्रदेशमध्येकाँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याने पक्षाच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. क्रॉस वोटिंग केलेले आमदार मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यावर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच सुख्यू सरकारमध्ये मंत्री असलेले विक्रमादित्य सिंह यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशातीलकाँग्रेस सरकारभोवती अनिश्चिततेचे ढग दाटले असून सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांच्याविरोधात काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होट केले आणि भाजपचे हर्ष महाजन विजयी झाले. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांनी दिल्लीच्या नेतृत्वाला फोन करून आपण पक्षाच्या विरोधात नसल्याचे सांगितलं. या आमदारांची नाराजी मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यावर आहे. हिमाचलमधील सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री बदलावे लागतील, असा दबाव पक्ष नेतृत्वावर आणला जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह आणि उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांचे गट अगोदरपासूनच सुक्खू यांच्या बाजूने नाहीत. अशातच माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि विद्यमान मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
"आपण नेहमीच काँग्रेस हायकमांडचा सन्मान केला आहे. मात्र आमदार करत असलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळेच राज्यसभा निवडणुकीत आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. माझी निष्ठा आजही पक्षासोबत आहे," असं राजीनाम्यानंतर विक्रमादित्य सिंह यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हिमाचल प्रदेशातील सरकार वाचवण्यासाठी जबाबदारी काँग्रेस नेतृत्वाने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यावर सोपवली असून मुख्यमंत्र्यांना हटवावं लागलं तरी चालेल पण सरकार कोसळता कामा नये, अशा सूचना काँग्रेस नेतृत्वाकडून या दोन्ही नेत्यांना देण्यात आल्याची माहिती आहे.