हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर १८व्या लोकसभेचे पहिले सत्र सोमवार २४ जूनपासून सुरू होणार आहे. मोदी ३.० कार्यकाळातील हे पहिले अधिवेशन राहणार असून त्यात नव्या सदस्यांचा शपथविधी होणार आहे. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांची निवड या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी होण्याची शक्यता आहे. 'नीट' परीक्षेमधील घोळ, १५ राज्यांमध्ये ४१ वेळा झालेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे सरकार बॅकफूटवर आले आहे. नवसंजीवनी मिळालेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची तयारी असून लोकसभेचे पहिलेच अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
५८ मंत्र्यांनाही देणार शपथमोदी सरकारमधील ५८ मंत्री लोकसभेचे सदस्य आहे. त्यांनाही लोकसभाध्यक्ष शपथ देतील. २७ जून रोजी राष्ट्रपतींचे अभिभाषण होणार आहे. १ ते ३ जुलै या काळात दोन्ही सभागृहांमध्ये त्यावर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होईल. गेल्या कार्यकाळात हकालपट्टी झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे पुनरागमन होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
या मुद्द्यांवरून वादळ३ जुलैपर्यंत अधिवेशन चालणार असून गेल्या १० वर्षांमध्ये प्रथमच मोदी सरकारसमोर मजबूत विरोधी पक्ष राहणार आहेत. नीट परीक्षेतील गोंधळ, लोकसभा निवडणुकीनंतर शेअर बाजारातील घडामोडी इत्यादी मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होऊ शकतात.मणिपूरमधील हिंसाचार, बेरोजगारी, महागाई तसेच दोन मुख्यमंत्र्यांना अटक या मुद्द्यांवरून वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
अध्यक्षांची निवड कधी?२६ जूनला अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. जदयू आणि तेदेपा यांनाही या पदावर दावा केला आहे. मात्र, त्यांना उपाध्यक्षपद दिले जाऊ शकते. 'इंडिया' आघाडीने उपाध्यक्षपद मागितले आहे. ते न मिळाल्यास अध्यक्षपदासाठी उमेदवार उतरविला जाऊ शकतो.