- एस. पी. सिन्हापाटणा : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासमवेत महागठबंधनचे नवीन सरकार स्थापन केले असले तरी नव्या सरकारसमोरील आव्हानेही काही कमी नाहीत. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेले लालू कुटुंबीय व राजद नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव वाढू शकतो. सध्यातरी तीन पक्षांचे बडे नेते रडारवर आहेत. यात सृजनबरोबरच रेल्वे (आयआरसीटीसी) घोटाळ्यातही कारवाई होऊ शकते. सृजन घोटाळ्यातही सीबीआय नितीशकुमार सरकारमधील अनेक ज्येष्ठांना चौकशीसाठी बोलाविण्याची तयारी करीत आहे.
बंगालसारखी स्थिती बिहारमध्ये?
लालू कुटुंबावर आधीच सीबीआय किंवा ईडीची नजर आहे. राबडीदेवी यांच्या निवासस्थानापासून ते मीसा भारती यांच्या दिल्लीच्या निवासस्थानापर्यंत छापेमारी करण्यात आलेली आहे. आता लवकरच लालू कुटुंबीयांवरील कारवाईबाबत सीबीआय व ईडी सक्रिय होऊ शकतात. याच्या बदल्यात राज्य सरकार कोणत्या प्रकारची कारवाई करते, हेही समोर येईल. अशा स्थितीत पश्चिम बंगालसारखी स्थिती तर बिहारमध्ये होणार नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.