नवी दिल्ली - भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक १६ आणि १७ जानेवारी रोजी दिल्लीतीली एनडीएमसी कन्व्हेंशन सेंटरमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पक्षाचे सुमारे ३५० नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. १७ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या बैठकीचा समारोप होणार आहे. दरम्यान, याच बैठकीमध्ये भाजपाच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
यावर्षी नऊ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसबा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत बोलावण्यात आली आहे. सोमवारी दुपारी ४ वाजता दिल्लीतील एनडीएमसी कन्वेंशन सेंटरमध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीची सुरुवात पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भाषणाने होणार आहे. बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर ज्येष्ठ पदाधिकारी सहभागी होतील.
दरम्यान, कार्यकारिणीच्या या बैठकीमध्ये जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्यावर सहमती होण्याची शक्यता आहे. जे. पी. नड्डा यांना लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. जे. पी. नड्डा यांचा भाजपा अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा २० जानेवारी रोजी संपुष्टात येणार आहे. संघटनात्मक निवडणूक न झाल्याने नड्डा यांना पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्षाचे अध्यक्षपद सांभाळण्याची सूचना दिली जाऊ शकते. कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राजकीय, आर्थिक प्रस्तावांशिवाय जी-२० संमेलनाशी संबंधित कार्यक्रम आणि त्यामध्ये भाजपा खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांच्या भागीदारीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.