हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अनेक केंद्रीय मंत्री तसेच काही विद्यमान खासदारांना मैदानात उतरवले. त्यापाठोपाठ आता मे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काही माजी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी देण्याबाबत भाजप ज्येष्ठ नेते विचार करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, गुजरातेत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना लोकसभा निवडणूक लढविण्यास सांगितले जाऊ शकते. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लव देव यांनाही लोकसभेला उतरवले जाऊ शकते.
कुणाची वर्णी, कुणाची हकालपट्टी
आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि झारखंडचे अर्जुन मुंडा सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. सदानंद गौडा आणि रमेश पोखरियाल निशंक या माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात आले, ही बाब वेगळी आहे. झारखंडचे रघुवर दास आणि आनंदी बेन पटेल यांना अनुक्रमे राज्यपाल केले.