देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. भाजपा, काँग्रेससह अनेक पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राजकारणी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अभिनेत्री कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपाची उमेदवार आहे. अशा स्थितीत काँग्रेसने पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. हिमाचलच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मंडी लोकसभा प्रभारी यांनी भाजपा उमेदवार कंगना राणौतवर निशाणा साधला आहे.
"जेव्हा मंडीतील लोक दुःखात होते तेव्हा कंगना कुठे होती?, मंडीतील लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर ते विमानाने मुंबईला जातील का?" असा सवाल विचारत खोचक टोला लगावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आपल्या प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांना मंडीच्या जागेवर उतरवण्याच्या तयारीत आहे. या जागेवर प्रतिभा सिंह यांनी निवडणूक लढवल्यास कंगनाला कडवी टक्कर द्यावी लागेल.
हिमाचलच्या मंत्र्यांनी कंगनाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. हिमाचल प्रदेश सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि प्रतिभा सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह यांनी कंगना राणौतवर टीकास्त्र सोडलं आहे. मंडीत दुर्घटना घडली, रस्ते खराब झाले, पूल वाहून गेले, तेव्हा कंगना कुठे होती? असा सवाल विचारला आहे.
"कंगना निवडणूक जिंकली तरी ती मंडी येथे राहणार का? जर मंडीतील लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर ते विमानाने मुंबईला जातील का? निवडणूक जिंकल्यानंतर कंगना ब्लॉक स्तरावर जाणार का? तिला पंचायतींच्या समस्या समजतील का? हिमाचलचे लोक अडचणीत असताना कंगना रणौत कुठे होती?" असे अनेक प्रश्न विक्रमादित्य यांनी विचारले आहेत.