२६ जानेवारीला प्रमुख पाहुणे म्हमून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे येणार होते. परंतु बायडेन यांनी गेल्याच आठवड्यात भारतात येणार नसल्याचे कळविले आहे. यामुळे भारताने प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुण्यांचा शोध सुरु केला होता. पीटीआयनुसार भारताने यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना अधिकृत निमंत्रण पाठविल्याचे समजते आहे.
पंतप्रधान मोदी यांनी जुलैमध्ये फ्रान्सचा दौरा केला होता. यावेळी ते पॅरिसमध्ये फ्रान्सच्या राष्ट्रीय दिवस समारंभात पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. तेव्हाच मोदी यांनी मॅक्रॉन यांना निमंत्रण दिले होते. 14 जुलै 1789 रोजी बॅस्टिल डे हा लष्करी किल्ला आणि तुरुंगाच्या पतनाचा दिवस आहे. संतप्त जमावाने त्यावर हल्ला केला आणि तेथील कैद्यांची सुटका केली होती. हा दिवस फ्रान्सच्या क्रांतीचा दिवस मानला जातो.
2024 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून इमॅन्युएल मॅक्रॉन हे सहावे फ्रेंच नेते असणार आहेत. फ्रान्सचे माजी पंतप्रधान जॅक शिराक यांनी 1976 आणि 1998 मध्ये दोनदा या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. 1980, 2008 आणि 2016 मध्ये फ्रान्सचे नेते आले होते.
भारत नेहमीच प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी परदेशी नेत्यांना निमंत्रित करतो. कोरोनामुळे काही वर्षे यात खंड पडला होता. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे आले होते.